अहमदनगर। नगर सहयाद्री-
निवडणूकीचे बिगुल वाजत नाही तोच अहमदनगर मध्ये ७२ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रोकड हवाल्याची असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती.
देशात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पोलिस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले आहेत. पोलीस दलाकडून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अधीशले यावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नाकाबंदी, गस्त वाढविण्याचे आदेश एलसीबीसह स्थानिक पोलिसांना दिले होते. दरम्यान एका कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात काल सायंकाळी छापेमारी करून ७२ लाखांची रोकड ताब्यात घेतली.
याप्रकरणी चेतन पटेल व आशिष पटेल वा दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी एवढी मोठी रोकड नगर शहरात कशासाठी आणली होती. याबाबतची चौकशी त्यांच्याकडे सुरू असून नगर शहरात मोठ्या प्रमाणात हवाल्याचा धंदा सुरू असून ऐन निवडणुकीच्या काळात हवाल्याची रोकड पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.