अहमदनगर । नगर सह्याद्री
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगर बाजार समितीतील भाजीपाला व कांदा विभाग शनिवारी (दि.४) बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सुटल्याने हा बंद मागे घेण्यात आला असून बाजार समितीतील सर्व व्यवहार शनिवारी सुरळीत सुरु राहणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे यांनी दिली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने शनिवारी (दि.४ नोव्हेंबर) बंदची हाक दिली होती. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला व कांदा विभाग बंद राहणार होता. मात्र गुरुवारी (दि.२) रात्री मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याबाबतची घोषणा केलेली आहे.
त्यामुळे शनिवारी मार्केट बंद ठेवून काही साध्य होणार नाही. यामुळे मार्केट सुरू ठेवणे बाबत फळे भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोकराव लाटे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांचे समवेत मोबाईलद्वारे संपर्क साधून चर्चा झालेली आहे व मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे सभापती बोठे यांनी सांगितले.
तरी सर्व अडतदारांनी आपल्या आपल्या दुकानावरील हमाल,मापाडी यांना संपर्क करून आडत दुकान चालू असले बाबत सर्वांना कळवावे. तसेच फेसबुक, व्हाट्सअप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकर्यांनाही जास्तीत जास्त प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात यावी. तसेच शेतकर्यांनीही आपला शेतमाल विक्रीसाठी शनिवारी बाजार समितीत आणावा असे आवाहन सभापती भाऊसाहेब बोठे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाजीपाला फळफळावळ आडते असोसिएशन अध्यक्ष अशोकराव लाटे आदींनी केले आहे.