अहमदनगर। नगर सहयाद्री-
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहायक अभियंता (वर्ग २) याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना पकडले. अमित किशोर गायकवाड (वय ३२ रा.प्लॉट नं २ आनंदविहार नागापूर, अहमदनगर, मूळ रा. चिंचोली ता. राहुरी) असे अभियंत्याचे नाव आहे. त्याने ही लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्यासाठी स्वीकारल्याचे सिद्ध झाले आहे.
दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर अधीक्षक वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रूपयांचे बिल मिळावे यासाठी त्यांचा पाठपुरावा होता. बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर त्याच्या सह्या घेऊन हे देयक पाठवायचे होते. त्या मोबदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी व वाघ याच्यासाठी बिलाच्या कामाचे व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणून एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. तशी तक्रार शासकीय ठेकेदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
नाशिकच्या पथकाने शुक्रवारी दुपारी नगर-संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या बाजुला सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी व वाघ याच्यासाठी स्वीकारली. एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष ही लाच स्विकारली आहे. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन करून लाचेच्या रकमेबाबत माहिती दिली. त्याच्या हिश्याची ५० टक्के रक्कम कोठे पोहचवावी, बाबत विचारले असता वाघ याने सांगीतले की, ’राहु दे तुझ्याकडे बोलतो मी तुला ते तुलाच पोहचवायचे आहे एका ठिकाणी, सांगतो नंतर सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेऊन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले आहे.