विक्रम राठोड यांचा खासदार विखे यांच्यावर निशाणा!
अहमदनगर | नगर सह्याद्री
शिर्डी मतदार संघातील सहा हजार कटुबांना साखर वितरण करत मतदार संघातील मतदारांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय विखे पाटील कटूंबानी घेतला आहे. उत्तरेत सुरू असलेल्या साखर वाटपावरून दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी निशाणा साधला आहे.
विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदार संघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावली निमित्त ५ किलो मोफत साखर भेट देण्याच्या योजनेचा शुभारंभ खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. दक्षिणेतुन निवडून येऊन उत्तरेत साखर वाटण्यावरून शिवसेनेने खासदार विखे यांना निशाण्यावर घेतले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, खासदार सुजय विखे यांनी दक्षिणेतुन विजय मिळवल्यानंतर प्रत्येक दिवाळी उत्तरेतील जनतेबरोबर साजरी करताना दिसत आहे. खासदार सुजय विखे हे नगर उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदार संघात साखर वाटीत फिरत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी नगर दक्षिणेत साखर वाटणे अपेक्षित होते.
उत्तरेकडील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे प्रश्न सोडवता. मग नगर दक्षिण विषयी सापत्न भाव का ठेवता?आपण नगर दक्षिण लोकसभा मतदार संघावर अन्यायच करतात. नगरचा निधी शिर्डीला वळवला. आता दिवाळीचा साखरेचा गोडवा देखील तिकडेच वाटत आहात.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व शासन आपल्या दारी, कार्यक्रम देखील शिर्डीलाच. कर्जत जामखेडला एमआयडीसीला विरोध करत उत्तरेला एमआयडीसी दिली. उत्तरेला दिवाळी आणि दक्षिणेला काय शिमगा का? असा सवाल राठोड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.