अहमदनगर। नगर सहयाद्री-
राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आराखड्यात नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसुली मंडळांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून उर्वरित गावांच्या बाबतीत जिल्हाधिकार्यांकडून अहवाल मागवून या गावांबाबतही निर्णय केला जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. अनेक तलाव आजही कोरडेठाक आहेत. कोणत्याच धरणात पुरेसा पाणी साठा नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील यांनी सरकारकडे यासाठी पाठपुरावा केल्याने जिल्ह्यातील दुष्काळी महसूल मंडळांना न्याय मिळणार आहे.
नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ९६ गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत झाल्याने या गावांना जमीन महसूल घट, पिक कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलाच्या वसुलीत स्थगिती शालेय व महाविद्यालयीन फी माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पाण्याचे टॅकर्स आशा सवलती तातडीने लागू करण्याता निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.