अहमदनगर | नगर सह्याद्री
ड्रग्ज असलेले इंटरनॅशनली अनधिकृत पार्सल रद्द करण्याच्या नावाखाली एका सायबर गुन्हेगाराने युवतीकडून पाच लाख आठ हजार रूपये ऑनलाईन घेतल्याची बाब समोर आली आहे. राहाता तालुयातील कोल्हार भगवतीपूर येथील युवतीने या संदर्भात बुधवारी (दि. ८) येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल नंबरधारक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार २५ ऑटोबरला घडला आहे. फिर्यादी युवती शिक्षण घेते. तिच्या मोबाईलवर २५ ऑटोबरला एका अनोळखी नंबरवरून फोन आला, ‘मी फेडेस डिपार्टमेंटमधून बोलतो’, असे त्या व्यक्तीने सांगितले. दरम्यान, फोन करणारा व्यक्ती सायबर गुन्हेगार होता व त्याने फिर्यादी युवतीचा विश्वास संपादन करून, तुमच्या नावाने ड्रग्ज असलेले इंटरनॅशनली अनधिकृत पार्सल थायलंड येथे जात आहे.
ते रद्द करायचे असल्यास तुम्हाला पाच लाख आठ हजार रूपये ऐवढी रक्कम भरावी लागेल’, अशी बतावणी केली. फिर्यादी युवतीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन व घाबरून पाच लाख आठ हजार रूपये ऑनलाईन दिले. आपली फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.