पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणार्या कर्जुले हरेश्वर गावच्या सरपंचपदी सौ. सुनिता तुकाराम मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री हरेश्वर ग्रामवैभव मंडळाने बहुमताने सत्ता हस्तगत केली होती.
पहिल्या अडीच वर्षासाठी सौ. संजीवनी आंधळे यांची निवड करण्यात आली होती. मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार सौ. आंधळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ. सुनिता मुळे यांचे नाव अंतिम करण्यात आले.
सौ. संजीवनी आंधळे यांचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पंकज जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत सरपंचपदासाठी सौ. सुनिता मुळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्जाची छाननी होऊन तो मंजूर करण्यात आला. सरपंच पदासाठी विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने सौ. मुळे यांची बिनविरोध झाली असल्याचे श्री. जगदाळे यांनी जाहीर केले.
सौ. मुळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामपंचायत चौकात फटाक्यांची अताषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. ग्रामदैवत श्री हरेश्वर महाराज मंदिरात विजयी सभा होऊन गावच्या विकासाचा रथ सक्षमपणे, सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. सुनिता मुळे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार शिवाजी शिर्के, माजी सरपंच साहेबराव वाफारे, माजी सरपंच सौ. संजीवनी आंधळे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष एकनाथ दाते, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ उंडे यांचीही भाषणे झाली.