कोल्हापूर / नगर सह्याद्री : दोन सख्खे भाऊ खेकडे पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत मोठी धक्कादायक घटना घडली. तेथे डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने दोघे मरण पावले.
धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तेथील नागरिकांनी भीतीपोटी त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दिले होते. ही घटना राक्षी (ता. पन्हाळा) येथे बुधवारी (दि. ८) रात्री घडली.
परंतु याचा उलगडा सोमवारी (दि. १३) सकाळी झाला. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०, दघे रा. राक्षी) अशी मृतांची नावे असून त्यांच्या मृतदेहाचा शोध पोलीस घेत आहेत.
अधिक माहिती अशी : जोतीराम व नायकू बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी धरणाचा ओढा परिसरात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी मुलांनी शोधाशोध सुरू केली. ड्रोनने शोधाशोध करूनही कुंभार बंधूंचा शोध लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासादरम्यान गावातील काही लोकांनी धरणाचा ओढा परिसरात डुकरांच्या शिकारीसाठी विजेच्या तारा बसवल्याची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली.
त्यानुसार त्यांच्याकडे अधिक तपास केला असता कुंभार बंधूंचा मृत्यू तारा ला स्पर्श करून झाल्याचे समोर आले. कुंभार बंधूंचे मृतदेह सहा जणांनी जवळच्या जंगलात फेकून दिले. पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.