अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील एक कोटीचे लाच प्रकरण राज्यात गाजले. यातील एक आरोपी लाच घेताना जाळ्यात अडकला. परंतु मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ मात्र मागील अनेक दिवसांपासून फरार होता.
परंतु आज त्यालाही पकडण्यात यश आले आहे. मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जात असताना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने नाशिकजवळ सापळा लावून पकडले व गजाआड केले.छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदार यांनी अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या 31 कोटींच्या कामाचे राहिलेले 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल काढायचे बाकी होते.
यातही एक कोटीची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी एमआयडीसी अहमदनगर उपविभागाचा सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड याला लाच घेताना रंगेहात पकडले होते. त्याने ही लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता वाघ याच्या करीता स्वीकारली असल्याचे कबूल केले होते. परंतु वाघ फरार होता.
अभियंता अमित किशोर गायकवाड याची यापूर्वीच न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. मात्र, उपअभियंता वाघ दहा दिवसांपासून पसार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले.