अहमदनगर / नगर सहयाद्री :
शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास जैन समाजाने विरोध केला आहे. याबाबत जैन समाज व भाजपा जैन सेल प्रकोष्ठ रविंद्र बाकलीवाल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना हा जीआर रद्द करावा असे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जीआर काढून शालेय पोषण आहारात पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी, अंडी पुलाव, अंडी असलेली बिर्याणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने हा निर्णय अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला आहे असे सांगितले जात आहे.
परंतु हा निर्णय जैन समाज व शाकाहारी लोकांच्या भावनांना ठेच पोहचवणारा असून पूर्ण शाकाहारी असलेल्यांना मांसाहारी बनविण्याचे षडयंत्र आहे. सरकारने सर्व जातीधर्माच्या परंपरा, धार्मिक रितीरिवाज याची दखल घेऊन जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे.
या वेळी अनिल कटारिया, महावीर बड़जाते, धीरज पोखरणा, संजय कासलीवाल, अशोक चुडीवाल, विजय खबिया, संतोष भटेवाड़ा आदी उपस्थित होते.