अहमदनगर / नगर सहयाद्री : आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक विजय ऊर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे यांच्यासह ५ ते ६ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या साहित्याच्या १० संच पेट्या बेकायदेशिररित्या बाळगून शासनाची फसवणूक केली व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याचे राजकीय पडसाद देखील उमटले आहेत. हिंगे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांनी केलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप गावकर्यांनी केला व आश्वी बुद्रुक ग्रामस्थांनी काल गाव बंद ठेवले.
त्यामुळे आता नेमके काय घडले की खरोखर राजकरण झाले याची आता चर्चा सुरु आहे.बांधकाम कामगारांच्या संच संदर्भात ईमेलवर तक्रार अर्ज प्राप्त झाल्याने सहाय्यक कामगार आयुक्त श्री. कवले यांनी कामगार अधिकारी तुषार बोरसे व दुकान निरीक्षक ललित प्रकाश दाभाडे यांना सदर ठिकाणी जावून चौकशी करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सदर अधिकाऱ्यांनी संगमनेरचे तलाठी यांना पंच म्हणून सोबत घेत सदर ठिकाणी जावून पाहणी केली. निमगावजाळी ते आश्वी बुद्रूक रोडचे उजव्या बाजुस विजय हिंगे यांचेकडे आश्वी बुद्रूक येथे जावून केलेल्या पाहणीत बांधकाम कामगारांना देण्यात येणारे संच प्रत्येकी किंमत ८ हजार ५०० असे एकूण १० संच बेकायदेशिररित्या आढळून आले. सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे.
सदर कारवाईच्यावेळी अज्ञात ५ ते ६ इसमांनी अधिकाऱ्यांना सरकारी काम करत असतांना अडथळा आणला. सदर १० संच हे विजय हिंगे यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीलगत ऊसाच्या शेतात आढळून आल्या. या पेट्या मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून कुणाची तरी नावे वाटप करुन घेतल्या परंतु त्या कामगारांना वाटप न करता स्वतःजवळ बाळगून शासनाची फसवणूक केली. तसेच सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी कामकाज करत असतांना शारीरिक बळजबरी करुन कामकाजात अडथळा आणला, अशी फिर्याद कामगार अधिकारी तुषार बोरसे यांनी दिली.