नगर सह्याद्री / जालना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले होते.
तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या घटनेनंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे टार्गेट केले गेले.
गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, आरटीआयकडून मागवलेल्या माहितीतून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत अशी माहिती आता आरटीआय मधून समोर आली आहे.
जालना जिल्हा जनमाहिती अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक (गृह) आर.सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी ही माहिती मागितल्यानंतर ही माहिती समोर आली होती. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी हल्ला केला. अनेक आंदोलक जखमी झाले. या झटापटीत अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. लाठीमारानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र झाले.
लाठीमाराच्या आदेशांसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले होते. दरम्यान, माहिती अधिकाराद्वारे समोर आलेल्या माहितीमुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.