पारनेर | नगर सह्याद्री – तालुयातील ढवळपुरीसह परिसरातील तळागाळापर्यंत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार नीलेश लंके [MLA NILESH LANKE] यांच्या प्रयत्नातून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रास अखेर मंजुरी मिळाली आहे. या संदर्भातील एक पत्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता आरोग्य केद्रांची संख्या १०३ झाली आहे. ढवळपुरी परिसरातील आदिवासी, धनगर, मेंढपाळ समाजासह सर्वानाच याचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात याआधी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५६० पेक्षा अधिक उपकेंद्र होते. यात आता ढवळपुरीचा समावेश होणार आहे. पारनेर तालुयाचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलाही चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनसह ढवळपुरी येथे नवीन आरोग्य केंद्र मंजुरीसाठी आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे याला मंजुरी मिळाली.
या आरोग्य केंद्रास जागा अधिग्रहित करून जिल्हा परिषदे कडून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिथे पदनिर्मिती करण्यासाठी स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, ढवळपूरी येथील नवीन आरोग्य केंद्रामुळे परिसरातील १० ते १२ गावांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामासाठी आमदार नीलेश लंके यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अनेकदा राज्य शासन दरबारी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. या मागणी व पाठपुराव्यामुळे हे आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे.