अहमदनगर / नगर सहयाद्री :
Ahmednaagr Politics : गणेश कारखान्यात आम्हाला राजकारण करायचे नाही. ही शेतकरी, सभासदांची संस्था आहे. ती टिकली आणि चांगली चालली तर या परिसराला आनंदाचे दिवस येतील. आमचा हेतू चांगला आहे, त्यामुळे अनेक अडचणी येऊन देखील मार्ग निघत आहेत. कारखान्याचे धुराडे पेटले, गाळप सुरू झाले, साखरही बाहेर आली हे शुभ संकेत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच यावेळी ते म्हणाले की, काही मंडळी राजकारण करतील आपण एकजूट दाखवा.
गणेश कारखान्याच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण केल्या जातील. केवळ राजकारण म्हणून काही मंडळी या संस्थेला सहकार्य करणार नाही. सभासद, शेतकरी आणि कामगार यांनी ज्या एकजुटीने आजवर लढा दिला आणि गणेशचे धुराडे पेटवले, त्याच भूमिकेतून पुढचे चार महिने आपण काम केले तर या परिसराच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात यांनी कारखाना कार्यस्थळावर भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव लहारे, संचालक बाबासाहेब डांगे, संपतराव हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, अनिल गाढवे, गंगाधर डांगे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, शोभाबाई एकनाथ गोंदकर, कमलबाई पुंडलिक धनवटे, अरुंधती अरविंद फोपसे, आदींसह संचालक उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कोणतीही संस्था ही परिसरामध्ये चैतन्य निर्माण करत असते. गणेश कारखान्याच्या निमित्ताने राहाता परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. मुबलक पाणी आणि उसाची उपलब्धता असूनही गेले आठ वर्ष ही संस्था का चालवता आली नाही, हे मला न सुटलेले कोडे आहे. गणेश कारखान्याच्या रूपाने एक संस्था घडवायला मिळते, कामगार आणि सभासदांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता येते हे मी माझे भाग्य समजतो.
निळवंडे धरणाला मी जीवन ध्येय मानले आणि त्या भूमिकेतून काम केले. गणेश कारखान्याकडेही मी त्याच भूमिकेतून बघत आहे, कदाचित परमेश्वराची इच्छा असेल म्हणूनच हे शुभकार्य तो माझ्या आणि विवेक कोल्हे यांच्या हातून करून घेत आहे.‘ यावेळी बहुसंख्य कामगार आणि सभासद उपस्थित होते त्यांच्याशी बोलताना आ. थोरात म्हणाले, मला आनंद आहे, ही संस्था आता तुम्हाला तुमची वाटायला लागली आहे.‘
गणेश सुरू होईल की नाही हीच शंका अनेकांना होती, दररोज नवी अडचण आमच्यासमोर निर्माण केली जात होती. या परिसरातील जनतेची जिद्द आणि आशीर्वाद फार मोठे आहेत आम्ही चांगला हेतू ठेवला आणि त्यामुळे प्रत्येक अडचणीवर मार्ग निघत गेला. प्रश्न अजूनही संपलेले नाही, संचालक बांधवांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गावागावात शेतकऱ्यांशी संवाद साधा आणि त्यांना विश्वास द्या. शेतकरी बांधवांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता गणेश सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी गणेशलाच ऊस घातला पाहिजे.
गणेश चालवण्यासाठी आम्ही प्रामाणिक आणि टोकाचे प्रयत्न निश्चित करू, मात्र शेतकरी सभासद आणि कामगार यांनी सुद्धा संयम आणि सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. पुढचे तीन-चार महिने अत्यंत महत्त्वाचे आहे, आजवर आपण ज्या एकजुटीने गणेशचे धुराडे पेटविण्यासाठी मेहनत केली त्याच भावनेने पुढेही काम करू. गणेश परिसरातील ऊस गणेशलाच आला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांकडे आग्रह धरा, आपण रात्रीचा दिवस करू पण या संस्थेला सोन्याचे दिवस आणू. या परिसराच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण होईल तो आपल्या सर्वांना आयुष्यभर समाधान देऊन जाईल, असेही थोरात म्हणाले.