Maharashtra News : मुंबई / नगर सह्याद्री – आगामी लोकसभा निवडणुकीत
महायुती व महाआघाडीत कोण किती जागा लढावणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत फडणवीस म्हणाले आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत (भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी-अजित) जागावाटप निश्चित झाले आहे.
फडणवीस म्हणाले की, भाजप राज्यातील 26 जागांवर निवडणूक लढवणार आहे. फडणवीस यांचे हे वक्तव्य अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आले आहे. ज्यात त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर इतर राज्यांमध्ये निवडणुका सुरू असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असं ते म्हणाले होते.
शिवसेना- राष्ट्रवादीला 22 जागा
देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, भाजप 26 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे 22 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 मध्ये, भाजपने लोकसभेच्या 25 जागा लढवल्या होत्या आणि तत्कालीन शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी भाजपने 23 आणि सेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. आता हा जागा वाटपाचा फॉर्म्युला शिवसेना व राष्ट्रवादीला मान्य आहे का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.