अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. थंडीची चाहूल लागण्याआधीच अवकाळी बरसला. हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होताच. काल (दि.२६) रोजी नगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यात ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसाने काही ठिकाणी पिकांची नासाडी झाली.
तर काही ठिकाणी पाण्याची गरज होतीच. तेथील पिकांना चांगले वातावरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती कुठे खुशी तर कुठे गम अशी होती. श्रीरामपूर, राहाता, अकोले, पारनेर, राहुरी, नगर शहर, नगर तालुका आदी भागांत जोरदार पाऊस झाला. राहाता शहर व परिसर तसेच शिर्डी व तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला.
अकोले शहर व तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. नेवाशात ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. संगमनेरमधेही जोरदार पाऊस झाला. सायंकाळी रिमझीम सुरू होती. भंडारदरा, मुळा पाणलोटातही मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याचे कळते.
पारनेर तालुक्यालाही रविवारी दुपारनंतर वादळी वार्यासह आलेल्या आवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. कांदा, चारा पिके, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, राळेगण थेरपाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा नगर शहर आणि तालुक्यात परिसारात ढगाळ वातावरण होते. दुपारी 4 च्या सुमारास अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. शिरूर, जामखेड तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली.