अहमदनगर / नगर सह्याद्री :
Ahmednagr Crime News : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे. शाहरुख सत्तार खान (वय 23 वर्षे, रा. पानीविस कॉलनी, ता. जि. जालना), दीपक लक्ष्मण भुसारे (वय 27 वर्षे, रा. गोकुळवाडी, ता. जि. जालना), ओंकार उर्फ मंथन प्रफुल्ल ताठीया (वय 22 वर्षे, रा. वडगांव बु, ता. जि. पुणे) या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून 54 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना नेवासा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. अधिक माहिती अशी : दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी अजित सिद्राम गुळवे (वय 26 वर्षे, रा. शिंगोणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे त्यांच्या पिकअप मधून सोलापूरकडे जात असताना त्यांना झोप लागल्याने देवगड फाटा, ता. नेवासा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन झोपी गेले.
त्याचवेळी तीन इसम त्याठिकाणी आले. त्यांना मारण्याची धमकी देत त्यांचेकडील तसेच गाडीमधील क्लिनर यांचेकडील मोबाईल, रोख रक्कम असा 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना याबाबत तपासाचे सूचित केले. त्यानुसार आहेर यांनी पथक नेमून तपास सुरु केला.
पथकाने लागलीच घटना ठिकाणास भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत तांत्रिक विश्लेषणाच्या सदरचा गुन्हा शाहरुख सत्तार खान याने दोन साथीदारांसह केला असल्याची महिती मिळाली. पोलिसांनी त्याला जालना येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.