पारनेर / नगर सह्याद्री :
Ahmednagar News : पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत धनादेश अपहार प्रकरणी एक लिपिक व खातेदार यांच्यावर ८ महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. मात्र तत्कालीन शाखाधिकारी सदाशिव फरांडे व अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. लेखापरीक्षण झाल्यावर दोषींवर गुन्हे दाखल करू अशी बँक व पोलिसांनी त्या वेळी भूमिका घेतली होती.
या धनादेश अपहार लेखापरीक्षण झाले असून जिल्हा लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी तो अहवाल सहकार आयुक्त अनिल कवडे यांना सादर केला आहे. त्या अहवालाचे अवलोकन करून सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी चेक अपहार प्रकरणात फसवणूक करणाऱ्या जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करावेत म्हणून जिल्हा लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांची
प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आता जिल्हा लेखा परीक्षक राजेंद्र निकम हे सैनिक बँक शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांच्यासह आणखी किती लोकांवर गुन्हे दाखल करतात याकडे सैनिक बँक सभासदाचे लक्ष लागले आहे.
कर्जत शाखेतील तत्कालीन शाखाधिकारी सदाशिव फरांडे याने कर्मचारी व चेअरमन यांचाशी संगनमत करून धनादेश घोटाळा केला आहे. शाखा आधिकारी सदाशिव फरांडे याला पाठीशी घालणारे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, चेअरमन शिवाजी व्यवहारे व काही दोषी संचालकावर गुन्हे दाखल व्हावेत म्हणून आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. – बाळासाहेब नरसाळे, सैनिक बँक बचाव कृती समिती.