दत्ता उनवणे / निघोज: Ahmednagar news :राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार दि.३० रोजी पारनेर तालुक्यातील गारपीटग्रस्त भागांची पाहणी करीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या. योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज, गांजीभोयरे, सांगवीसुर्या वडुले, राळेगण थेरपाळ तसेच पंधरा ते वीस गावांना वादळीवाऱ्यासह गारांच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत. याबाबत यातील काही गावांना नामदार विखे पाटील यांनी भेटी देत परस्थीतीची माहिती करुण घेत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना सुचना दिल्या. यावेळी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती काशिनाथ दाते सर, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखीले, बाजार समितीचे संचालक डॉ आबासाहेब खोडदे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, संदीप सालके, शिवाजीराव सालके, जनसमृद्धी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेश गोपाळे, भाजपचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लम इनामदार ,पारनेर तालुका विखे युवा मंचचे प्रवक्ते प्रतिक वरखडे , आपले गाव गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग आदी तसेच भाजपचे कार्यकर्ते तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ आबासाहेब खोडदे यांनी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची मंत्री विखे पाटील यांना माहिती दिली. डॉक्टर खोडदे म्हणाले शेतीमालाला भाव नाही त्यातच यावर्षी पाउसाचे प्रमाण अत्यल्प आहे. शेतकरी पुर्णपणे हतबल झाला आहे त्यातच रविवारी झालेल्या गारपीट,वादळी वारा तसेच पाउस कांदा उत्पादक शेतकरी, फळबागायतदार तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून सरकारने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी एक ते सव्वा लाख रुपये नुकसानभरपाई दिली तरच शेतकरी समर्थपणे उभा राहील तसेच बॅंका, सोसायटी पतसंस्था यांच्या वसुली थांबवावी अशी मागणी केली. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकपाण्याची पहाणी केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.
नामदार विखे पाटील यावेळी म्हणाले परस्थीती अत्यंत गंभीर आहे याची सरकारला जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून पंचनामा करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी नामदार विखे पाटील यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखीले, संदीप सालके यांनी तालुक्यातील गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसानी झाल्या असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देउन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला आधार देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी परिसरातील महिलांनी नामदार विखे पाटील यांना भेटून सविस्तर निवेदन दिले तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देउन शेतकरी कसा उभा राहील यासाठी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांना शासकीय मदत तातडीने देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांच्या मागणीची घेतली दखल
गांजीभोयरे हे गाव जवळा मंडलात आहे. जवळा मंडलामध्ये कुकडी पट्ट्यातील गावे येतात. त्यामुळे पिकांच्या आणेवारीत शेतकऱ्यांना भुर्दंड बसत आहे. त्यामुळे गांजीभोयरे या गावाचा समावेश वडझिरे मंडलात करण्यात यावे अशी मागणी माजी सरपंच व सोसायटीचे चेअरमन, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ आबासाहेब खोडदे यांनी नामदार विखे पाटील यांच्याकडे केली. यावेळी नामदार साहेब यांनी दखल घेत तशा प्रकारच्या सुचना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना दिल्या. अपुऱ्या पावसामुळे खरीप आणी रब्बी पेरण्या सोबत झाल्या आहेत एकरी ५५ ते ६० हजार रुपये कांद्यासाठी खर्च झाला आहे याचा विचार करून भरपाई मिळावी.
एकनाथ गंगाराम खोडदे (शेतकरी)
दादाभाऊ पांढरे, कुसूम पांढरे यांची विचारपूस
गारपीट सुरू झाल्यानंतर गारपीटीतून नातवाला वाचविण्यासाठी दादाभाऊ पांढरे या वृद्धाने त्याला कवटाळून घेत स्वतः पाठीवर गारपीट घेतली. त्यात त्यांची पाठ काळीनिळी झाली .तसेच कुसूम पांढरे यांच्यसह कांदालागवड करणाऱ्या पंधरा महिलांनाही दुखापत झाली. मंत्री विखे पाटील यांनी दादाभाऊ पांढरे कुसूम पांढरे तसेच महिलांची आस्थेने विचारपूस केली.
जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन ज्ञानदेव माऊली पठारे यांचे नुकतेच निधन झाले. मंत्री विखे पाटील यांनी वडूले येथील पठारे मळ्यात जाऊन पठारे कुटुंबाचे सांत्वन केले.
वडूले येथील विजय संपतराव पठारे यांचा ऊस तसेच डाळींबाचा बाग पुर्णपणे उध्वस्त झाला. चार दिवसांत प्रशासनाकडून काहीही मदत मिळाली नाही. आलेल्या या संकटामुळे व्यथीत झालेल्या विजय पठारे यांना मंत्री विखे पाटील हे उसाच्या शेतात पोहचल्यानंतर रडू कोसळले. विखे पाटील यांनी पठारे यांना शासन तुमच्या पाठीशी आहे असा धीर देत पठारे यांना आधार देण्याचे काम केले.