अहमदनगर / नगर सह्याद्री : मागील अनेक वर्षांपासून नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून यासाठी दलित समाजाने विविध स्तरावर पाठपुरावा आंदोलने केली. त्याला अखेर यश आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन १४ जानेवारी होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती होणार आहे.
याबाबत माहिती देताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली. त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सर्वांच्या विचारातून या पुतळ्याची निर्मिती होणार असून हा पुतळा असा असेल की राज्यातील जनता हा पुतळा पाहण्यासाठी आवर्जून नगरमध्ये येईल असे ते म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन १४ जानेवारी होणार असून आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत आंबेडकरी समाजाची बैठक पार पडली. यावेळी अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अजय साळवे, विलास साठे, विजय भांबळ, सुमेध गायकवाड, सुनील क्षेत्रे, विजय गव्हाळे, नितीन कसबेकर, किरण दाभाडे, प्रा. विलास साठे, कौशल गायकवाड, अनंत लोखंडे, विशाल भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे, पीरबाई भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
सुरेश बनसोडे म्हणाले की, नगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी सर्वांची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे, त्यासाठी आ,संग्राम जगताप यांचे मोठे योगदान लाभले आहे. या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर पडेल व या माध्यमातून आजच्या युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अवगत होतील असे ते म्हणाले.
अशोक गायकवाड म्हणाले की, शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारत असून याचा सर्वांना आनंदच आहे, आ. संग्राम जगताप यांनी या कामासाठी पुढाकार घेतल्यामुळेच हे काम पूर्णत्वास जात आहे, तसेच भिंगार मधील भीमनगर येथे सामाजिक न्याय भवन उभे करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे असे ते म्हणाले.