पारनेर | नगर सह्याद्री
आमदार नीलेश लंके यांच्यावतीने घेण्यात येणार्या जनता दरबारात सोमवारी पारनेर पंचायत समिती व महसूल विभागाच्या नावाने सर्वांत जास्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जनता दरबारात १८९ तक्रारींवर सोमवारी चर्चा करण्यात येऊन पुढील जनता दरबारात त्यावर अहवाल सादर करण्याच्या सुचना आ. लंके यांनी यावेळी दिल्या. मागील जनता दरबारातील १२७ तक्रारींचा अहवालही यावेळी देण्यात आला.
सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेला जनता दरबार सायंकाळी साडेपाच वाजता संपला. प्रत्येक तक्रारीवर चर्चा करण्यात येऊन संबंधित तक्रारदाराचे समाधान झाल्यानंतरच पुढील तक्रारीवर चर्चा करण्यात येत असल्याने आलेल्या तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. मागील जनता दरबारातील तक्रारींवर या बैठकीत अहवाल सादर करण्यात आला.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता जनता दरबार सुरू झाला. एकूण १८९ तक्रारदारांनी यावेळी लेखी तक्रारी दाखल केल्या. त्या प्रत्येक तक्रारीचा आढावा आ. लंके यांनी घेतला. त्यावरील संबंधित अधिकार्याची काय भूमिका आहे, येत्या महिनाभरात त्या तक्रारीचे निराकारण होईल किंवा नाही यावर चर्चा करण्यात येऊन पुढील तक्रारीवर चर्चा करण्यात आली.
मांडवाच्या आदिवासी कुटुंबांची १९३८ सालातील तक्रार
मांडवेखुर्द येथील आदिवासी बांधवाने यावेळी आ. नीलेश लंके यांच्यापुढे त्याची कैफीयत मांडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. सन १९३८ मध्ये त्याच्या आजोबांच्या नावावर असलेले क्षेत्र अद्यापही त्याच्या नावावर करण्यात येत नाही. महसूल विभागाकडे हेलपाटे मारून अनेक चपला झिजल्या मात्र न्याय मिळाला नसल्याचे त्याने सांगितले. महसूल विभागाच्या अधिकार्यांनी संबंधित आदिवासी बांधवाच्या तक्रारीचे निराकारण करण्याच्या सुचना आ. लंके यांनी यावेळी दिल्या.