अवैध धंदे बोकाळले | उद्योजकांनाही ‘वसुली’चा त्रास | एजंटांचा सुळसुळाट
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहराला लागून असणार्या एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी व्हायला तयार नाही. अन्याय झालेल्या सामान्यांना न्याय देण्याऐवजी कायदा हातात घेणार्यांसाठी पायघड्या घालणार्या अधिकार्यासह कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उद्योजकांमधून पुढे आली आहे. अवैध धंदे बोकाळले असताना त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी उद्योजकांना वेठीस धरले जात असून ‘वसुली’साठी छळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. एजंट मार्फत तडजोडी अन् त्यातून होणार्या उलाढालीबाबत पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी लक्ष घालण्याची मागणी ‘आम्ही उद्योजक’ या स्वयंसेवी संघटनेकडून करण्यात आली आहे.
नगर शहरात चालणारा जुगार-मटका, बिंगो, सट्टेबाजी, अमली पदार्थ, मावा, गुटखा व बंदी असलेली सुगंधी सुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे चालू असताना त्याबाबत तक्रार करुनही कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी येथे बदलून आलेल्या अधिकार्याने त्याच्या मर्जीतील काही कर्मचार्यांना मुक्तहस्ते मोकळीक दिली आहे. मलिद्यासाठी वाट्टेल ते आणि कोणाच्याही गळ्याला सुरा लावण्याचे प्रकार यातून वाढले आहेत. साध्या तक्रारीवर निर्णय घेत सामान्यांना न्याय देण्याऐवजी त्याच तक्रारीच्या आधारे समोरच्यांकडून माल उकळण्याच्या घटनाही सातत्याने घडू लागल्या आहेत.
एमआयडीसीतील विविध कारखाने आणि आस्थापनांमध्ये कामासाठी येणार्या महिला आणि मुलींची राजरोसपणे छेड काढली जात असताना याबाबत पोलिसांना कळवूनही कोणतीच कारवाई होत नाही. कामावर येण्याच्या आणि घरी जाण्याच्या वेळेत रस्त्याच्या कडेला उभे राहून आणि चौकात कोंडाळे करत अनेक सडकछाप तरुणांकडून मुली-महिलांची छेड काढली जाते. याबाबत महिला-मुलींनी महिनाभरापूर्वी चौकातील अशा एका तरुणाला बेदम चोपही दिला. प्रकरण परस्पर मिटले असले तरी हे प्रकार अद्याप थांबायला तयार नाही.
संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यत रस्त्याच्या कडेल चालणारी नशाबाजांची हुल्लडबाजी आणि त्यातून सामान्य नागरिकांसह महिलांना होणारा त्रास सर्वश्रूत असताना एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी अन् कर्मचारी याबाबत काहीच कारवाई का करत नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे. उद्योजकांकडून काहीही अवैध कामे नसतानाही वसुली कोणत्या आधारे केली जाते याचे उत्तर आता पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनीच द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या प्रमुख कर्तव्यांचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असल्याने याला नक्कीच मोठे आशीर्वाद असणार हेही आता लपून राहिलेले नाही. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे. उद्योजकांसह सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी या पोलिस ठाण्याच्या कारभारात आता पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.