नगर सह्याद्री / नागपूर
उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु होईल. राज्यातील विविध प्रश्नांमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामधील 45 पेक्षा जास्त मोर्चांना परवानगी मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी हे अधिवेशन गाजेल असे म्हटले जात आहे.
अधिवेशनात असू शकतात ‘हे मुद्दे
उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्दे असतील. सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येऊ शकतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या नुकसानीची भरपाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांची बैठक
अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. विरोधकांच्या बैठकीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
100 मोर्चे विधिमंडळावर धडकणार
नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त मोर्च्यांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅन तैनात असणार आहे. अधिवेशन काळात पोलीसांचं जेवण, निवास आणि आरोग्याची उत्तम व्यवस्था असेल, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.