पारनेर / नगर सह्याद्री :
तालुक्यातील वडगाव सावताळच्या ओढा जोड प्रकल्पास नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी १० लाख १३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे व माजी सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.
या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रकल्पासाठी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मान्यता मिळवली. आता वडगाव सावताळ, शिंदे मळा परिसरात ५०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे व डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी सांगितले.
वडगाव सावताळ येथील फकीर नाल्यातून वाहून जाणारे पाणी नळ्यांच्या माध्यमातून शिंदे मळा येथील गचकी तलावात सोडले जाणार आहे. त्याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल. या प्रकल्पासाठी सरपंच धनंजय शिंदे, सुनील शिंदे, सर्जेराव रोकडे, मिठू शिंदे, शिवाजी रोकडे, चेअरमन बाबासाहेब दाते, भाऊसाहेब खामकर, योगेश शिंदे, राधु शिंदे, महादू रोकडे, रामदास खामकर, मंगेश खामकर, योगेश रोकडे आदींचे शिष्टमंडळ आग्रही होते.
वडगाव सावताळ येथील फकीरनाला मधून चार ते पाच महिन्यांपासून पाणी वाहून जात होते. त्यामुळे या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे माजी सरपंच धनंजय शिंदे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी विश्वनाथ कोरडे सतत प्रयत्नशील असतात. आता वडगाव सावताळ येथील ओढा जोड प्रकल्प मार्गी लावण्यात खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळविण्यात यश प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रेय घेण्याची तर काहींना सवयच
पाणी आडवा पाणी जिरवा या योजना गावागावात राबवून जलस्त्रोत वाढविले. शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल यासाठी वडगाव सावताळ मध्ये अंत्यंत कमी खर्चात ही योजना राबविली जाणार आहे. तर दुसरीकडे पारनेर तालुक्यात अनेक पुढारी न केलेल्या कामाचे श्रेय घेताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून थेट प्रशासकीय मान्यता घेत याचा प्रारंभ लवकरच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करणार असल्याचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे व माजी सभापती काशिनाथ दाते यांनी सांगितले.