नगर सह्याद्री / नागपूर :
नवाब मलिक यांनी काल (दि.८ डिसेंबर) अधिवेशनात हजेरी लावली. यावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार याना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत स्थान देता येणार नाही असे म्हटले.
तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील याला सहमती दर्शवली. त्यामुळे या प्रकरणी अजित पवार एकाकी पडल्याने आता अजित दादा गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल
जे काही घडलं ते सर्वांना माहीत आहे. मधल्या काळात राष्ट्रवादीत अंतर्गत घडामोडी झाल्या. त्यावेळी मलिक कुणाबरोबर नव्हते. कुणाशाही त्यांचा संबंध नव्हता. त्यांचा जामीन झाल्यावर आम्ही त्यांना भेटलो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं आमचं कर्तव्य होतं. ते आमदार आहेत. ते आल्यावर जुने सहकारी एकमेकांना भेटतात बोलतात. स्वाभाविक आहे. आम्ही नवाब मलिकांची भूमिका काय आहे? त्यांनी काय करायचं?
त्यांची उद्याची वाटचाल काय असेल? यावर चर्चा केली नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसेच त्यांनी म्हटले की, नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर आहेत. आम्हाला अजिबात या विषयावर त्यांच्याशी चर्चा करायची नाही. विधानसभेत ते कुठे बसले हे महत्त्वाचे आहे. विधानसभेत बसण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे. म्हणून ते आले. ते आल्यावर कुणाला भेटले म्हणजे आम्ही त्यांना पुरस्कृत करतो किंवा अन्य कोणी करतो असं म्हणणं चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस यांननी काही पत्र लिहिलं असेल. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. नवाब मलिक आमच्याकडे की दुसरीकडे हा प्रश्न निर्माण केला नाही. जेव्हा होईल तेव्हा पाहू, असं पटेल यांनी सांगितलं.