आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री-
गेल्या सहा महिन्यांपासून दुधाचे बाजार दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळेे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच पशुखाद्याची किमतीही गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी पशुधन विक्रीसाठी बाजारत आणले जात आहे. बाजार फुल्ल झाला असला तरी दुधाला भावच नसल्याने कवडीमोल किमतीत गाई विकाव्या लागत असल्याचे भयाण वास्तव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील आठवडा बाजारात (शनिवार दि. ९) मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे शेतकर्यांनी विक्रीसाठी आणली होती. दूध व्यवसाय हा शेतकर्यांसाठी एक प्रमुख जोडधंदा असून हा व्यवसाय अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. तालुका दूध उत्पादनात अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचे संकलन होते. सध्या दुधाला मिळत असलेल्या कमी भावामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
एकीकडे दिवसेंदिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे. तर दुसरीकडे दुधाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे काष्टी बाजारामध्ये गाई विक्रीसाठी गर्दी दिसून आली. बाजारामध्ये योग्य तो दर मिळत नसल्याने याचा मोठ्या प्रमाणात फटका तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना बसत आहे. दूध व्यवसायात आलेल्या मंदीमुळे दूध उत्पादक शेतकर्यांवर उपासमारीची व बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने गाईंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी गाईंची संख्या वाढली आहे. याचा परिणाम गाईंच्या दरावर झाला आहे.काष्टी बाजारात गाईचे खरेदी विक्रीची उलाढाल लाखोंची होत होती. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून गाईचे दुधाचे दर कमी झाल्यामुळे प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शेतकरी गाई विक्रीचा पर्याय निवडत आहेत. दुधाचा दर स्थिर राहील याची खात्री मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले दिसत आहे. गेल्या दहा वर्षात प्रथमच इतकी गंभीर स्थिती झाल्याची शेतकरी सांगत आहेत.