पारनेर।नगर सहयाद्री-
तालुयातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या चंपाषष्ठी महोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह ही पूर्वापार चालत आलेली परंपरा नसून १२ वर्षापासून चालू केलेली आहे. त्यामुळे यासंबंधी विश्वस्तांच्या बैठकीत बहुमताने ठराव झाला असतानाही देवस्थानचे माजी अध्यक्ष पांडुरंग गायकवाड व माजी उपाध्यक्ष रामदास मुळे यांनी नगरच्या धर्मदाय उपायुक्तांकडे या संदर्भात केलेली मागणी धर्मदाय उपायुक्त यु. एस. पाटील यांनी फेटाळून लावली आहे.
अॅड पांडुरंग गायकवाड व रामदास मुळे यांनी ९ डिसेंबर ते १६ डिसेंबर या चंपाषष्टीच्या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करावा, अशी मागणी करणारा लेखी अर्ज व प्रतिज्ञापत्र नगरच्या धर्मदाय उपायुक्तांकडे ३ नोव्हेंबरला दाखल केले होते. या अर्जात इतरही काही मुद्यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकत चंपाषष्ठी काळात अखंड हरिनाम सप्ताह घेण्याची मागणी केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. चंपाषष्ठीच्या काळात अखंड हरिनाम सप्ताह साजरा न केल्याने देवस्थानचे काही नुकसान होणार नसून केवळ आपल्याला देवस्थानचा अध्यक्ष न केल्याने सध्याच्या अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाला मानसिक त्रास देण्याचा हेतू प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
19 नोव्हेंबरच्या कोरठण खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत विश्वस्तांना नोटीस बजावून व बैठकीमध्ये चर्चा होऊन वार्षिक यात्रोत्सवाच्या दरम्यान हा अखंड हरिनाम सप्ताह करण्याचे ठराव झाला आहे. असे असताना माजी अध्यक्ष व माजी उपाध्यक्षांना चंपाषष्ठीतच अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्याचा आग्रह व मागणी बेकायदेशीर असल्याचेही धर्मादाय उपायुक्त यांनी आदेशात म्हटले आहे. मागणी फेटाळल्यामुळे आता वार्षिक यात्रोत्सवात अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष सौ शालिनी अशोक घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे व ज्येष्ठ विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.