नगर सह्याद्री / मुंबई
कांदा मध्यंतरी 40 ते 45 रुपये किलोपर्यंत गेला होता. परंतु निर्यात बंदीमुळे सध्या हा कांदा 18 ते 22 रुपये पर्यंत आला आहे. परंतु आता लसणाने उचल खाल्ली आहे. सध्या लसूण तब्बल 400 रुपये किलो झाला आहे. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाववाडीतून सातत्याने रडवलं. पण आता लसणाचा ठसका जोरात लागला आहे. लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत.
लसणाच्या किमती का वाढल्या?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा परिणाम लसणावर देखील झाला आहे. पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 200 ते 250 रुपये किलो हा लसूण होता. आता तो 350 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत हे दर आहेत. नवीन पीक बाजारात येण्यास वेळ असल्याने तोपर्यंत भाव असेच असतील असे म्हटले जात आहे.
किती वाढले दर?
मागील महिन्यात लसणाचा दर 120 ते 140 रुपये इतका होता. हाच दर 400 रुपयांवर गेला आहे. दिवाळीच्या निमित्ताने गुजरात आणि मध्यप्रदेशमधून लातुरच्या बाजारात लसूण विक्रीला आला होता. आठवड्याला किमान 100 क्विंटल लसूण बाजारात आणला गेला होता. आता हा दर 400 रुपयांवर गेला असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.