पारनेर | नगर सह्याद्री-
पंधरा दिवस उलटूनही सांगवी सूर्या, वडुले, पानोली गावातील गारपीटग्रस्तांना शासकीय मदत मिळाली नाही. तसेच कांद्यासह दूध व शेतमालाचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकर्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली पानोली येथे मंगळवारी (दि. १२) सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलन केले.
तालुकाप्रमुख पठारे व माजी सभापती सोन्या बापू भापकर यांच्यासह शेतकर्यांच्या वतीने मंडळ अधिकारी सचिन पोटे यांना निवेदन दिले.यावेळी सामजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड, माजी सरपंच संदीप गाडेकर, संजय भगत, रामा गाडेकर, खोडदे, भागाशेठ गायकवाड, राजू शिरसगर, शरद गायकवाड, मोहित जाधव यांच्या शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनात निघोज, जवळा, गुणोरे, गाडीलगाव, राळेगण, पठारवाडी, सांगवी, पानोली, वडुले, पिंपळनेर, गांजीभोयरे, गाडीलगाव, म्हसे, कोहकडी येथील गारपीटग्रस्त शेतकरी, दूध उत्पादक सहभागी झाले.
निवेदनात म्हटले, की सांगवी सूर्या येथे विठ्ठल मंदिरात गारपीटग्रस्त शेतकर्यांचे ९ डिसेंबरपासन जनावरांसह शासकीय मदतीच्या मागणीसाठी साखळी उपोषण चालू आहे. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप शासनाकडून दखल घेण्यात आली नाही.
त्याचप्रमाणे केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी घालणे, उसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी घालणे, दुधाचे दर पाडणे असे शेतकरी विरोधी निर्णय घेतले आहेत.
त्यामुळे या निर्णयांचा निषेध म्हणून शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. शासनाने शेतकर्यांच्या व गारपीटग्रस्तांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी शेतकर्यांनी केली.