‘अमृत’चे ३० डिसेंबरला लोकार्पण
अहमदनगर | नगर सह्याद्री-
अमृत योजनेचे काम पूर्ण होऊन नगर शहरात वसंत टेकडीपर्यंत पाणी उपलब्ध झाले आहे. टाक्यांची उभारणी होऊन त्यातून पाणी पुरवठा करण्याचे काम १५ दिवसात पूर्ण करा. टाक्या भरण्यात अडथळा ठरणार्या अनधिकृत जोडण्या तोडून टाका, असे आदेश देत ३० डिसेंबरला अमृत पाणी योजना व फेज टू योजनेतील टायांचे लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी केली.
खासदार विखे यांच्या उपस्थितीत महापालिकेत पाणी योजना, भूयारी गटार योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी अमृत योजनेतील सर्व स्थापत्य कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक कामातील स्काडा योजनेचे काम पूर्ण होऊनही काही किरकोळ कामांमुळे ती कार्यान्वित झाली नाही. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद, प्रस्ताव यावरून मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकार्यांत टोलवाटोलवी सुरू झाली.
खासदार विखे यांनी कोणत्याही परिस्थितीत ही सर्व कामे पूर्ण करून ३० डिसेंबरला लोकार्पण करण्याचे जाहीर केले. तुम्ही काहीही करा, आता हा विषय ३० डिसेंबरला संपलाच पाहिजे, अशी तंबी त्यांनी दिली. भूयारी गटार योजनेचे बहुतांश काम झाले आहे. किरकोळ कामे सुरू आहेत. एसप्रेस फिडरच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन हे काम मार्गी लावा, त्यासाठी वाढीव निधीची गरज असल्याने प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर करा, मी तत्काळ निधी देतो, असे सांगत खासदार विखे यांनी यातून मार्ग काढला.
३१ जानेवारीपर्यंत ही कामे पूर्ण करा. नेहरू मार्केटच्या उभारणीबाबत यावेळी चर्चा झाली. महापालिकेने तयार केलेल्या तीन मजली इमारतीचे डिझाईन सादर केले. यात सुलभ शौचालयासाठी जागा प्रस्तावित करा, असे खासदार विखे यांनी सांगितले. तसेच, दोन मजली तरतूद करा. बांधकामासाठी जो खर्च येईल, त्यासाठी निधी उपलब्ध करून देतो, असे खासदार विखे यांनी यावेळी सांगितले.