नागपूर / नगर सह्याद्री –
Maharashtra Politics : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा झालेला निर्णय ऐनवेळी फिरला. तो निर्णय झाला असता तर राधाकृष्ण विखे पाटील त्याच वेळी मुख्यमंत्री झाले असते. २०१४ ला शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री बननण्याच्या विखे पाटील यांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची खमंग चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात सध्या रंगली आहे.
राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने मंगळवारी सकाळी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना २०१४ साली चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात येणार होता. त्यांच्या जागी राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत होती, असा खळबळजनक खुलासा केला आहे. या चर्चेमुळे विखे पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आले आहेत.
२०१४ साली आषाढी एकादशीनंतर चव्हाण यांचा राजीनामा होणार होता. त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू होत्या. मुख्यमंत्री या नात्याने चव्हाण यांनी आषाढी एकादशीची पुजा केली आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय मावळला होता. या घटनेस वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे.
विखे पाटील हे सुद्धा त्याच काळात मुख्यमंत्रीपद मिळण्याच्या आशेने दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी आवश्यक राजकीय जुळवाजूळवही केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना ग्रीन सिग्नलही दर्शविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध ताणले गेले होते. अशा काळात विखे पाटील यांना मुख्यंमंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती.
विखे पाटील एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, असे सांगितले जात असताना ऐनवेळी त्यांचे मुख्यमंत्री पद हुकले. त्यानंतर २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. तर, २०१९ च्या आषाढी एकादशीच्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सध्या महायुतीच्या सरकारमध्ये विखे पाटलांकडे महसूलमंत्री पॅद आहे. तसेच आगामी काळात २०२४ मध्ये भाजपकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होऊ शकतात, असा अंदाज राजकारण्यांकडून व्यक्त केला जात आहे.