पुणे / नगर सह्याद्री : संचेती हॉस्पिटल तर्फे ऑर्थोएआय हे जनरेटिव्ह एआय टूल सादर करण्यात आले आहे. यामुळे ऑर्थोपेडिक तज्ञांना व्यापक व समृद्ध वैद्यकीय साहित्य उपलब्ध होईल. ऑर्थोपेडिक तज्ञांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा जगातील पहिलाच उपक्रम आहे. यामुळे आर्थोपेडिक तज्ञांना प्रकाशित झालेले असंख्य शोधनिबंध आणि व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळतील.
ऑर्थोएआयच्या उद्घाटनावेळी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन व संचेती हॉस्पिटलच्या अॅकेडेमिक्स अॅन्ड रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ.अशोक श्याम, कन्सल्टंट आर्थोपेडिक सर्जन डॉ.नीरज बिजलानी आणि स्क्रीप्ट लेन्सचे व्यवस्थापकीय भागीदार रोहन लुणावत आणि अमित येरुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम म्हणजे पुणेस्थित आयटी कंपनी असलेल्या स्क्रिप्ट लेन्समधील आयटी तज्ञ व संचेती हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने गेल्या एक वर्षापासून केलेल्या व्यापक संशोधनाचा परिणाम आहे. ऑर्थोएआय हे एलएलएम आणि कॉग्निटिव्ह सर्च वर तयार केलेले व पुराव्यावर आधारित जनरेटिव्ह एआय मॉडेल असून यामुळे संबंधित व्हिडिओ व माहितीसाठ्यासह संदर्भासह प्रश्नांची उत्तरे मिळतात.
उद्घाटनप्रसंगी बोलताना शास्त्रज्ञ डॉ.आर.ए.माशेलकर म्हणाले की, तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी अंर्तदृष्टी महत्त्वाची असते. पण त्यापेक्षा अधिक दूरदृष्टी महत्त्वाची असते. भारताने डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून डाटा वापरामध्ये आपण जगात आघाडीवर आहोत. एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाबाबत अनेक आव्हाने आहेत आणि त्यासाठी बहुआयामी दृष्टीकोनाचा अवलंब केला पाहिजे असे ते म्हणाले.
डॉ.नीरज बिजलानी म्हणाले, मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब असलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये व जन्मजात असामान्यता असलेल्या बालवयोगटातील किंवा कोणत्याही गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या व्यक्तींकरिता ही संकल्पना उपयुक्त ठरेल. डॉ.पराग संचेती म्हणाले की, ऑर्थोपेडिक्स रूग्णांसाठी सर्वोत्तम सेवा प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अत्यानंद होत आहे.