मुंबई / नगर सह्याद्री : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आता लोकसभा निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. भाजप सध्या एकहाती सत्ता घेण्यासाठी कंबर कसत आहे. मागील दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत भाजपने मिळवले होते.
आता भाजप विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं,
याबाबत टाइम्स नाऊ आणि इटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्व्हे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबतही अंदाज सांगितला गेला आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे. टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास ४८ जागांपैकी महायुतीला २७ ते ३१ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे.