अहमदनगर / नगरसह्याद्री : प्रा.डाॅ. देवीप्रसाद खरवंडीकर यांचे आज (दि.१४) निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर आज दुपारी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉक्टर खरवंडीकर यांचा जन्म एक ऑक्टोबर 1935 रोजी झाला. ते संस्कृत साहित्यिक होते. ग. दि. माडगूळकरांचे गीत रामायण आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांचा त्यांनी संस्कृत अनुवाद केला.
संस्कृत भाषेचा गेल्या पन्नास वार्षांपासूनच त्यांचा व्यासंग राहिला आहे. अनेक शोधनिबंधाचे त्यांनी लिखाण केले. पंचवीस ग्रंथांचे संपादन, 20 स्वतंत्र संस्कृत ग्रंथांचे लेखन, दोनशेहून अधिक संस्कृत कविता आणि दीडशे पेक्षाही अधिक संपादकीय लेख प्रसिद्ध आहेत. 50 हून अधिक पीएचडीच्या प्रबंधाचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संस्कृत पंडित ही पदवी देखील मिळाली होती. त्यांना सावेडी भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.