नागपूर / नगर सह्याद्री : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी खुशखबर आली आहे. लवकरच 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. विधान परिषदेत सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली असताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. गृहविभागाने नवीन आकृतीबंध केल्यामुळे आता 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहे.
‘असा’ असेल नवीन आकृतीबंध
मागील ७० वर्षांत आकृतीबंध झाला नव्हता. जून महिन्यात राज्याचा आकृतीबंद करण्यात आला. यामुळे राज्यात पोलिसांची संख्या किती आहे आणि किती भरण्याची गरज आहे याची माहिती मिळाली असून गृह विभागातील १९७६ पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. पोलीस दलात भरतीची प्रक्रिया सुरु आहे. परंतु नवीन आकृतीबंधानुसार जागा वाढल्या आहे. यामुळे नवीन आकृतीबंधानुसार पोलीस भरती होणार असल्याचे ते म्हणाले.
वयोमर्यादा वाढ होणार?
दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती कर्मचारी असले पाहिजे, असा सर्व आकृतीबंध झाला आहे. प्रथमच असा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. मागील दोन वर्षांत कोव्हीडमुळे भरती झाली नव्हती. त्यानंतर ही भरती सुरु झाली आहे.
त्याकाळात देण्यात आलेली वयोमर्यादाची वाढीची मुदत आता संपणार आहे. ती संपण्याच्या आत नवीन भरती करता येईल का? हा विचार करण्यात येणार आहे. यासाठी आधी जाहिरात काढून हवे तर नंतर भरती करता येईल का? हा निर्णय गृहविभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.