पारनेर / नगर सह्याद्री : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी व माळकूप शिवारातील रस्त्याच्या बाजूची जवळपास २०० झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली. एका खासगी कारखान्यास वीजपुरवठा व वितरण करण्यासाठी हा प्रताप ठेकेदाराने केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत माळकूप ग्रामस्थांनी गुरुवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे यासंबंधी लेखी तक्रार केली आहे.
महावितरण कंपनीचे माळकूप येथील खासगी साखर कारखान्यासाठी ३३ के.व्ही.च्या उच्च दाब वाहिनीसाठी रस्त्याच्या कडेने वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी खासगी ठेकेदाराकडून ही झाडे कत्तल केली जात आहेत. ग्रामस्थांनी गुरुवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे यासंबंधी लेखी तक्रार केली.
पारनेर मधील वनविभागाने नगर कल्याण महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ५३ झाडे तोडण्याची लेखी परवानगी ४ डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथील साई एजन्सीला दिली आहे. परंतु नियम पायदळी तुडवून शेकडो झाडांची कत्तल या ठेकेदाराने केली असल्याचा आरोप भाळवणी व माळकूप ग्रामस्थांनी केला आहे. शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्या सबंधित एजन्सीवर, ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परवानगी ५३ झाडांची, कत्तल शेकडो झाडांची
महावितरण कंपनीने ३३ केव्हीचा उच्च दाब वाहिनीसाठी पारनेरच्या वनविभागाच्या पंचनाम्याप्रमाणे ५३ झाडांची परवानगी कंपनीसाठी दिली. परंतु या ठेकेदाराने सरसकट शेकडो झाडांची कत्तल केली आहे. यासंबंधी माळकूप ग्रामपंचायत सरपंच संजय काळे यांनी लेखी ठराव केला आहे. भाळवणी व माळकूप येथील वड-५, बाभूळ-१७, लिंब-४, निलगिरी-२३, काशिद-४ अशा एकूण ५३ झाडांची परवानगी दिली असताना शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.