मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन
मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करणार्या व्यक्तींना आवर घालण्याची मागणी
अहमदनगर –
मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करणार्या व्यक्तींना आवर घालण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत १३ डिसेंबर रोजी संविधानिक पदावरून शेंडी गावातील महिला सरपंच गावबंदी बाबत सरळ सरळ खोटं म्हणणं मांडलेले आहे. तसेच सरपंच प्रयागाबाई लोंढे यांना गावबंदी ही कोणत्या सभेला गेल्या म्हणून केली नव्हती तर त्यांनी काही व्हाट्सअप ग्रुपवर बेताल व खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते.
त्यावरून त्यांचा गावकर्यांनी निषेध केला होता. त्या महिला सरपंचांना कुठलीही गाव बंदी नसून त्या ग्रामपंचायत कार्यालयात नित्याने येत आहे. आणि गावातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमास ही त्यांची उपस्थिती आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ हे हिंगोलीच्या जाहीर सभेत तसेच विधानसभेमध्ये दोन समाजात जातीय तेढ निर्माण व्हावे या उद्देशाने महिला सरपंच सभेला आली म्हणून तिला शेंडी गावातील मराठा समाजाने गाव बंदी केली असे खोटे आरोप मराठा समाजावर करत आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिंब्यावर मी या मराठ्यांना चांगला धडा शिकवीन असे या महिलेचे भाष्य आहे. या विषयी गांभीर्याने लक्ष घालून त्या महिलेला आणि माजी मंत्री भुजबळ यांना भडकाऊ भाषण करण्यापासून थांबवावे. महिला सरपंच प्रयागाबाई लोंढे व मंत्री छगन भुजबळ हे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असून तात्काळ यांच्यावर आवर घालण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांना निवेदनात केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे गोरख दळवी, अभय शेंडगे, अवधूत पवार, संदीप जगताप, आदिनाथ कांडेकर, निलेश कराळे, प्रवीण गुंड, अक्षय भगत, चांगदेव भगत, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.