अहमदनगर / नगरसह्याद्री : रविवारचा दिवस घातपात वार ठरला असून दोन वेगवेगळ्या भीषण अपघातात १२ लोक जागीच ठार झाले. यातील पहिली अपघाताची घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ घडली. यात अकोले येथील चौघे ठार झाले. तर दुसरी घटना अहमदनगर – कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्री घडली. यात आठ लोक जागीच ठार झाले आहेत.
पहिल्या घटनेत नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ मालवाहतूक ट्रक कारवर कोसळून अपघात झाला. यात चौघे जागीच ठार झाले. ही घटना काल (दि.१७ डिसेंबर) रात्री आठ वाजता घडली. यात आशा सुरेश धारणकर (वय ४२), सुनील धारणकर (वय ६५), अभय सुरेश धारणकर (वय ४५) व ओजवी धारणकर (वय २ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. यात अस्मिता अभय मिसाळ (वय ४०) या जखमी आहेत. अपघातातील मृत व जखमी अकोले तालुक्यातील कुंभेफळ गावातील रहिवासी आहेत. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. हा अपघात कोणत्या कारणास्तव किंवा कोणाच्या चुकीमुळे झाला याचा उलगडा अद्याप झाला नाही. जखमी महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर व फरार ट्रकचालक ताब्यात आल्यानंतर इतर गोष्टींचा उलगडा होईल.
दुसरी घटना अहमदनगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात 8 लोक ठार झाले असून मृतांत एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. भाजीपाला घेऊन चाललेल्या भरधाव पीकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चौघे मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने पिकअप चालला होता. त्याचवेळी कल्याणकडून ओतूरकडे प्रवासी रिक्षा आलेली होती.
डिंगोरे- पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर या दोघांची जोराची धडक झाली. यात रिक्षाचा चालक, दोन प्रवासी, पिकअप चालक, कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश मस्करे (30), कोमल मस्करे (25), हर्षद मस्करे (4), काव्या मस्करे (6), अमोल मुकुंदा ठोके, नरेश नामदेव दिवटे (66), अन्य दोघे (नाव माहित नाहीत) अशी मृतांची नावे आहेत.