अहमदनगर/नगर सह्याद्री : नगर शहरातून गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. रिजवान मुस्ताक शेख (वय २४, रा. झेंडीगेट) यास ताब्यात घेतले असून तौसिफ मुस्ताक कुरेशी (रा. हमालवाडा, झेंडीगेट) असे फरार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीकडून १ लाख २०० रुपयांचा ५०० किलो गोमांस व सुरा असा मुद्देमाल जप्त केला. अधिक माहिती अशी : पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेशित केले होते.
त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संतोष लोढे, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे यांचे पथक नेमले होते. या पथकास १७ डिसेंबर २०२३ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बाबा बंगाली मस्जिदजवळ गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून कत्तल करत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जात कारवाई केली. यावेळी रिजवान मुस्ताक शेख याला ताब्यात घेतले. तौसिफ मुस्ताक कुरेशी फरार झाला. आरोपी रिजवान मुस्ताक शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत.