मुंबई / नगरसह्याद्री : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहे. परंतु तुम्हाला जर म्हटलं की, तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायची संधी आहे, तर? ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. केंद्र सरकार तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे.
तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर 18 ते 22 डिसेंबर हे पाच दिवस तुमच्यासाठी खास असतील. आजपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2023-24 ची तिसरी सीरीज सुरू झाली आहे. आता तुम्हाला पुढील 5 दिवस बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी आहे.
10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?
सॉवरेन गोल्ड बॉन्डचे दर रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केले जातात. यात एक ग्रॅम सोन्याची किंमत 6199 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 10 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 61990 रुपये मोजावे लागतील. ही किंमत आजच्या बाजारभावापेक्षा कमी आहे.
ऑनलाइन खरेदीवर एक्स्ट्रा सूट
जर तुम्ही ऑनलाइन सोने खरेदी केले तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच, जर तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये पैसे ऑनलाइन गुंतवले तर तुम्हाला प्रति ग्रॅम 6149 रुपये खर्च करावे लागतील.
गोल्ड बॉन्ड कोठे खरेदी करावेत?
तुम्ही या गोल्ड बाँडमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करू शकता. तुम्ही कोणत्याही बँक शाखा, पोस्ट ऑफिस, बीएसई, एनएसई किंवा स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमधून खरेदी करू शकता.
किती व्याज मिळतेय?
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम सरकारने सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. सध्या यावर 2.5 टक्के दराने वार्षिक व्याजाचा लाभ मिळत आहे. जर तुम्हाला जास्त पैशांची गरज असेल तर तुम्ही त्यावर कर्ज देखील घेऊ शकता.
सॉवरेन गोल्ड बॉन्डची काय आहेत वैशिष्ट्ये
>> सार्वभौम गोल्ड बाँडचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षे आहे.
>> या योजनेत मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
>> जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी किंवा 5 वर्षांनी पैसे काढले तर तुम्हाला त्यावर LTCG भरावा लागेल.
>> तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) स्वरूपात सुमारे 20.8 टक्के कर भरावा लागेल.