अहमदनगर | नगर सह्याद्री
आजी व नातवाचा खून करणार्या दोघांना येथील जिल्हा न्यायाधीश आर. एन. नाईकवाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडीया (वय ६५), कमलसिंग उर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेकपालसिंग चितोडीया (वय ३० दोघे मूळ रा. केशरनगर, ता. भुसावळ, जि. जळगाव) अशी आरोपींचे नावे आहेत. त्या दोघांनी कमलाबाई कागडियासिंग चितोडीया (वय ६५) व तिचा नातू सुनिलसिंग उर्फ टकलूसिंग बुटासिंग चितोडीया (वय १० दोघे रा. चितोडगड, राजस्थान) यांचा खून केला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले. शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर ईतगाह मैदानावर अनोळखी अंदाजे ५५ ते ६० वर्ष वयाच्या महिलेचा हत्याराने मानेसह डोके तोडून खून केला होता. डोके गायब करून पुरावा नष्ट केला होता. तसेच १२ ते १५ वर्ष वयाचा अनोळखी मुलाला टनक वस्तुने डोयात मारून त्याचाही खून केला होता. ही घटना २३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११ ते २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी हॉटेल मंगेशसमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडीया (वय ६५), कमलसिंग उर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेकपालसिंग चितोडीया या दोघांची नावे निष्पन्न झाली होती. त्यांना अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली होती. तपासादरम्यान मयत महिलेचे फेकून दिलेले मुंडके जप्त केले होते. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासले. त्यात साक्षीदार, पंच, तपासी अधिकारी, डॉटर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरावा व युक्तीवादाच्या आधारे दोन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी तपासी अधिकारी निरीक्षक पाटील यांची साक्ष नोंदविली. तसेच या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार ए. बी. चव्हाण व ए. एन. बेळगे यांनी सहकार्य केले. हा सत्र खटला चालविणेकामी जिल्हा सरकारी वकील सतीष पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.