अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेकडे थकीत असलेल्या पाणी योजना व पथदिव्यांच्या विजेच्या थकीत बिलापोटी महावितरण कंपनीने पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. १६ फेब्रुवारीला याबाबत मनपाला नोटीस बजावली असून, तत्काळ ५.९० कोटींची थकबाकी न भरल्यास २१ फेब्रुवारीला कारवाई करण्यात येईल, असे महावितरण अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वर्षभरात महावितरण कंपनीने चार वेळा पाणी योजनेची वीज तोडली आहे. आता पाचव्यांदा वीज तोडली जाण्याची शयता असून त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शयता आहे. मार्च अखेरीच्या पार्श्वभूमीवर महावितरण व जलसंपदा विभागाकडून महापालिकेकडे वीज बिल व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी तगादा सुरू आहे. दर आठवड्याला कारवाईच्या नोटीसा दिल्या जात आहेत.
आठ-दहा दिवसांपूर्वीच महावितरण कंपनीने वीज तोडल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरण अधिकार्यांना कोंडल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला होता. आता पुन्हा महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. डिसेंबर महिन्याचे २.८२ कोटी, जानेवारी महिन्याचे २.८५ कोटी व नोव्हेंबर महिन्याच्या बिलातील १३.४९ लाख असे ५.९० कोटी रुपये तत्काळ जमा करावेत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.