बर्लिन : अनेकदा समुद्रात, नदीत जुनी ऐतिहासिक पाऊलखुणा आढळत असतात. आता अशीच एक समुद्रात ७० फूट खोल ११ हजार वर्षे जुनी दगडांची भिंत सापडली आहे. जर्मनीपासून जवळ बाल्टिक समुद्रात भिंत सापडली आहे. ही भिंत अतिशय प्राचीन आहे. त्यावेळी हा भाग समुद्राखाली गेलेला नव्हता. या भागात रेनडियरची शिकार केली जायची. समुद्रात सापडलेली भिंत ९७५ मीटर लांब असून ३ फूट उंच आणि ६.५ फूट रुंद आहे.
संशोधकांना भिंतीचा दोन तृतीयांश भाग सापडला आहे. या भिंतीमध्ये १६७० दगड आहेत. ही भिंत जर्मनीच्या रेरिक शहरापासून १० किलोमीटर दूर, बाल्टिक समुद्राच्या पृष्ठभागापासून ७० फूट खाली आहे. बाल्टिक सागराच्या या भागाला मेकलेनबर्ग खाडी म्हटलं जातं. ही भिंत युरोपच्या होलोसीन काळाच्या सुरुवातीला बांधण्यात आली.
प्राचीन काळात अशा भिंती शिकार करण्यासाठी बांधल्या जायच्या. शिकाऱ्यांचे समूह त्यांच्या शिकारीला पळायला भाग पाडायचे आणि या भिंत उभारलेल्या परिसरात आणायचे. समोर भिंत आडवी आल्यानं प्राण्यांना पळ काढता यायचा नाही आणि त्यांची शिकार करणं सोपं जायचं. या भागात रेनडियरची मोठ्या संख्येनं शिकार केली जायची.
या भागात आधी बर्फ होता. तापमान हळूहळू वाढू लागल्यानं बर्फ वितळू लागला. त्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढली. आधी ज्या भागावर भिंत उभारण्यात आली होती, तोच भाग समुद्राच्या पोटात गेला. सध्या सापडलेली भिंत समुद्रात ७० फूट खोलवर आहे.