अहमदनगर | नगर सह्याद्री
साकळाई उपसा सिंचन योजनेचा आराखड्याला आठ दिवसांत अंतिम मंजुरी देऊन निधी वर्ग करण्यात यावा. अन्यथा २५ फेब्रुवारी २०२४ रोजी चिखली टोलनाका येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा साकळाई कृती समितीने दिला होता. याबाबतचे निवेदन कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी यापूर्वीही कृती समितीच्यावतीने वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यापूर्वी दिलेल्या इशार्यामुळे राज्य सरकारच्या पातळीवर साकळाई योजना मंजुरीसाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्धता पत्राचे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव नाशिक कार्यालयाकडे तत्काळ पाठविण्याची कार्यवाही केली. यापुर्वी साकळाई कृती समितीने १४ फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता.
गेल्या २५-३० वर्षापासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेचा संघर्ष चालू असून साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपादन मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करू असे आश्वासन दिले होते.
आठ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अन्यथा लोकशाही मार्गाने २५ फेब्रुवारीला चिखली (कोरेगाव, ता. श्रीगोंदा) येथे सकाळी साडेनऊला नगर रोडवर जुना टोलनायावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली तरी साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने लाभधारक शेतकरी आक्रमक झाले आहेत. निवेदन देताना कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेेंडे, संतोष लगड, नारायण रोडे, रामदाम झेंडे, पुरुषोत्तम लगड, सोमनाथ धाडगे, रोहिदास उदमले, सुदाम रोडे, बापूसाहेब गाडेकर, शिवराम लंके प्रविण झेंडे आदी उपस्थित होते.