वाशीम / नगर सहयाद्री : राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी आली आहे. भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं आज ५९ व्या वर्षी निधन झालं आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचेही आज निधन झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात दुःखद वातावरण आहे. राजेंद्र पाटणी हे दीर्घ काळापासून आजारी होते. वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे ते आमदार होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजेंद्र पाटणी हे १९९७ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले त्यानंतर २००४ मध्ये ते कारंजा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता.