पारनेर / नगर सह्याद्री : शासनाच्या विविध धोरणांचा, निर्णयांचा निषेध करण्यासाठी पारनेरमध्ये क्रमबद्ध जनआंदोलन केले जात आहे. जनहितार्थ मागण्यांसाठी लोकशाही व संविधान बचाव अभियानाद्वारे हे आंदोलन सुरु करण्यात आले असल्याची माहिती अभियानाचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र करंदीकर यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणारी ईव्हीएम मशीन ही आधुनिक मनुस्मृती आहे. या मशीनला हद्दपार करणे, बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्यासाठी शिक्षणाचे खासगीकरण करणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करणे, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची खासगी कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरतीचा निर्णय, जीवनावश्यक वस्तूंवरील जाचक कर वसुली व त्याने निर्माण झालेली महागाई रोखण्यासाठी आदी गोष्टींचा विरोध करण्यासाठी व इतर जनहितार्थ मागण्यांसाठी क्रमबद्ध जनआंदोलन सुरु करण्यात आले असल्याचे करंदीकर म्हणाले.
२० फेब्रुवारीस बेमुदत उपोषण सुरु करून आंदोलसणास सुरवात झाली आहे. राजेंद्र करंदीकर हे उपोषणाला बसले आहेत.२१ फेब्रुवारीस हलगीनाद आंदोलन करण्यात आले. २२ फेब्रुवारीस घंटानाद आंदोलन झाले. २३ फेब्रुवारीस संविधानाचा जागरण गोंधळ असणार आहे. पारनेर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलने सुरु आहेत.
२६ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता संविधान सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.रफिक सय्यद, बाळासाहेब पातारे, राजेंद्र करंदीकर, संतोष वाडेकर, बाळासाहेब माळी, सुभाष लोंढे, रविंद्र साळवे, सतीश गोगडे, हसन राजे, अविनाश देशमुख, प्रदीप मोरे, योगेश सोनवणे, सुदाम कोरडे, मनोज सुर्यवंशी, वसंत कसबे, प्रदीप काळे, किरण सोनवणे, भगवान गायकवाड आदींनी केले आहे.