Lok Sabha Elections 2024:ऐंशी वयावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. घरी बसून अथवा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. नुकत्याच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रथम ही सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली होती. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशपांडे म्हणाले, मतदानाचा टक्का वाढावा, ज्येष्ठांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी निवडणूक कर्मचारी घरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना हा पर्याय देणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाच दिवसांत मोहीम राबविण्यात येणार आहे.
घरीच बसून मतदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्याकडून १२ ‘ड’ फॉर्म भरून घेण्यात येईल. त्यांनतर घरी पोलिंग बूथ आणून अधिकार्यांच्या उपस्थितीत मतदान करून घेण्यात येईल. त्यांना हा पर्याय दिला असला, तरी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर येऊनच मतदान करावे, यासाठी आम्ही अधिक प्रयत्न करणार आहोत. कारण ते मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यातून तरुणांमध्ये एक संदेश मिळेल. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाण असलेल्या दिव्यांगांनाही घरी मतदान सुविधा पुरविल्या जाणार आहेत. घरीच मतदान करण्याचा निर्णय घेणार्यांचे मतदान मतदानाच्या एक दिवस आधी करून घेतले जाईल.
उमेदवारी अर्ज भरताना अर्जाबरोबर नाव, पत्ता याबरोबरच संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती सादर करावी लागते. ती सर्व माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. परंतु यंदा प्रथमच मतदान केंद्राबरोबर प्रत्येक उमेदवारांची ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. जेणेकरून मतदारांना उमेदवाराची सर्व माहिती घेणे शय होणार आहे, असेही देशपांडे म्हणाले. मतदानाच्या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘सी व्हिजिल अॅप’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अॅपमधून तक्रार दाखल करता येणार आहे.
त्यामध्ये फोटो, व्हिडिओ शूटिंगही अपलोड करता येणार आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर १०० मिनिटांत भरारी पथक दाखल त्यांची खात्री करून कारवाई करतील. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाने विद्यार्थ्यांना गृहभेटी देऊन मतदान करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे मत परिवर्तन करण्यात येणार आहे. या शिवाय मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रातही त्यांची नियुक्ती करण्यात येईल. जेणेकरून त्यांना मतदानाची सर्व प्रक्रिया समजावी, तसेच त्यांच्यामध्येही मतदानाबाबत जनजागृती व्हावी, हा उद्देश असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
५० टक्के केंद्रांवर वॉच राहणार
यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करून तेथे वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. परंतु यंदा प्रथमच ५० टक्के मतदान केंद्रांवर ही सुविधा असेल. त्यासाठी मतदान केंद्र कोणती असणार आहेत, याचे निकष आयोगाने निश्चित केले आहेत. एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान पाच मतदान केंद्रांवर ही सुविधा असेल. त्यांची लिंक पोलिस ठाणे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध असेल. त्या माध्यमातून मतदान दिनी केंद्रांवर थेट वॉच राहील, असे देशपांडे म्हणाले.