नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मोठा भूकंप घडवून आणला आहे. नांदेडमधील तब्बल ५५ नगरसेवकांनी अष्टक चव्हाणांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय.
भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यानंतर ते प्रथमच नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. नांदेडमध्ये एन्ट्री करतानाच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नांदेडमधील ५५ नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतः चव्हाण यांनी ट्वीट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.