अहमदनगर | नगर सह्याद्री
शाळा- महाविद्यालयात गेलेली मुलगी अजिबातच सुरक्षीत नसल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये घडला आहे. मुलींच्या छेडछाडीसह अन्य गंभीर प्रकार काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. अशातच नगरमधील एका नामांकीत महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेणार्या मुलीचे हातपाय बांधून तिच्या अंगावर वर्गातील सर्व बेंच टाकून डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून यापूर्वी या मुलीचा विनयभंग आणि छेड ज्याने काढली व याबाबत ज्याच्यावर गुन्हा दाखल होता, त्याच्यावरच तरुणीने संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकाराने पालकांमध्ये प्रचंड दहशत आणि भितीचे वातावरण तयार झाले असून आपली मुलगी नगरमध्ये सुरक्षीत राहिली नसल्याची भावना यातून वाढीस लागली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, महाविद्यालयाची तासिकांची वेळ संपल्यानंतर विद्यार्थी- विद्यार्थीनी तसेच प्राध्यापक असे सारेच त्या इमारतीमधून खाली उतरले. दरम्यान याच वेळी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधलेले चार- पाच तरुण त्या इमारतीमध्ये घुसले.
हे तरुण इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर गेल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. दरम्यान, या तरुणांनी त्या तरुणीला वर्गातून बाहेर पडण्याच्या तयारीत असणार्या त्या तरुणीला गाठले. तिला प्रचंड मारहाण केली आणि तिचे हातपाय बांधले. हे तरुण एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी त्या तरुणीला खाली झोपवले आणि तिच्या अंगावर वर्गातील बेेंचेसे टाकले. अनेक बेेंच एकाचवेळी अंगावर पडल्याने ती मोठ्याने विव्हळत पडून राहिली. हे सारे होत असताना या तरुणीने त्या तरुणांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आले नाही. हात- पाय बांधलेल्या अवस्थेत बेंचखाली असलेल्या या तरुणीच्या मोबाईलवर त्याचवेळी तिच्या घरुन फोन आला. त्यावेळी तिने प्रयत्नांची शिकस्त केली आणि मोबाईल हातात मिळवला. मोबाईल हातात घेताच ती मोठ्याने रडू लागली आणि मदतीची याचना करु लागली. तिच्या वडिलांना आपली मुलगी मोठ्या संकटात असल्याची कल्पना आली. मुलीने तिच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला आणि ती कोठे आहे हेही सांगितले.
दरम्यान, मुलीचे पालक सायंकाळी सातच्या सुमारास महाविद्यालयात आल्यानंतर या घटनेची माहिती महाविद्यालयातील कर्मचार्यांना मिळाली. कर्मचार्यांच्या मदतीने पालकांनी घटनास्थळी म्हणजेच वर्गात धाव घेतली असता सदरची मुलगी बेंचखाली दबली असल्याचे लक्षात आले. पालक आणि कर्मचार्यांनी तिच्या अंगावरील बेंच बाजूला केले आणि तिचे हात- पाय मोकळे केले. मुलगी प्रचंड दहशत आणि भितीच्या सावटाखाली असल्याने तिला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. दरम्यान, मारहाण करणारे आणि हातपाय बांधणारे तरुण हे तोंडाला रुमाल, मास्क बांधून असल्याने ओळखू आले नसल्याचे तिने पोलिसांत सांगितले. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.
मुलगी जे सांगते त्यात तथ्य दिसून येत नाही: पीआय कोकरे
घटनेची माहिती मिळताच आमचे पथक तातडीने घटनास्थळी गेले. महाविद्यालयासह परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले आणि तपासण्याचे काम चालू आहे. याच मुलीने याआधी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका मुलावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का हेही आम्ही तपासून पाहत आहोत. या घटनेच्या अनुषंगाने आम्ही भादवि कलम ३२४, ३४२ नुसार गुन्हा नोंदविला आहे. मात्र, या घटनेत मुलगी जे सांगते आहे, तसे काही घडल्याचे दिसून येत नाही. मात्र, आम्ही सर्व अंगांनी तपास करत आहोत आणि यातील वास्तव सत्य लवकरच समोर आणू अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना गाठावे लागले कॉलेज
मुलीचे हातपाय बांधून गोंठून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर व याची माहिती समोर आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वत: तातडीने महाविद्यालय गाठले. महाविद्यालयात ज्या इमारतीच्या मजल्यावर हा प्रकार घडला, त्याची पाहणी आणि घटनेची माहिती त्यांनी स्वत: घेतली. या घटनेत जे कोणी सहभागी असतील त्यांचा तातडीने शोध लावला जाईल आणि दोषींना कठोर शासन केले जाईल अशी ग्वाही पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी माध्यमांशी बोलताना दिली.