नांदेड / नगर सह्याद्री : मराठा आरक्षण आंदोलनाची धग अद्यापही धगधगत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला, बैठकीला मोठा प्रतिसाद मराठा समाजाचा मिळत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर हे आंदोलन पुन्हा पेटले आहे. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश नाही.
बंदीचे बॅनर लावून गावकऱ्यांनी तशी शपथ घेतली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पळसगाव, टाकळगाव या गावातील सकल मराठा समाजाने एकत्र येत ओबीसींतून आरक्षण मिळणार नाही; तो पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत राजकीय नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे. अशी शपथ घेण्यात आली.
विधानसभा आणि लोकसभेतील बहुतांश आमदार आणि खासदार हे मराठा समाजाचे असल्याने ते मराठा आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत. गावात येण्यास सर्व नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाकळगाव, पळसगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने गावात येऊ नये, असे ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावकऱ्यांनी घेतली शपथ घेतली आहे.